चाळीसगाव येथील बसस्थानकाजवळील घटना; डंपर चालक पोलीसात हजर
चाळीसगाव – हॉस्पिटलमधून काम आटोपून दुचाकीने घरी जाणाऱ्या परिचारीकेच्या वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव डंपने जोरदार धडक दिल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परीसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर डंपर चालक स्वत:हून शहर पोलीसात हजर झाल्याचे वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश शिरसाठ यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयाबाई बारी ह्या शहरातील रेल्वे स्टेशनरोड असलेल्या मशिद जवळ असलेल्या डॉ. अमिज जैन यांच्या रूग्णालयात परिचारीका म्हणून काम करत होत्या. सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास काम आटोपून मोपेड गाडी क्रमांक (एमएच १९ सीके ६९१५) ने चाळीसगाव बसस्थानक जवळील हनुमान मंदीरासमोरून जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारा डंपर (एमएच ४३, बीपी १७२६) ने जोरदार धडक दिली. धडक देताच महिला दुभाजकावर डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कालच झाले होते डांबरीकरणाचे काम
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री चाळीसगाव बसस्थानक परीसरातील रोडचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे दुभाजकाजवळ बारीक वाळू खडी पडलेली होती. या वाळू व खडीमुळे महिलाची गाडी घसरल्याने महिला डंपरच्या पुढल्या चाकाखाली आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ही घटना घडताच चाळीसगाव शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.