भरधाव डंपरने उडवल्याने कंडारीत सायकलस्वाराचा मृत्यू

0

भुसावळ : भरधाव डंपरने सायकलस्वारास उडवल्याने 58 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कंडारी येथील नागसेन कॉलनीजवळ रविवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रामा गोविंद वाचकर (58, नागसेन कॉलनी, कंडारी) असे मयताचे नाव आहे.

डंपर चालकाविरुद्ध गुन्हा
रामा वाचकर हे सायकलीने जात असताना कंडारी येथील नागसेन कॉलनीजवळील डॉ.सूर्यकांत पाटील यांच्या घराजवळ भरधाव डंपर (एम.एच.19 झेड.4847) ने धडक दिल्याने वाचकर हे गंभीर जखमी झाले तर डंपर चालक पसार झाला. जखमी अवस्थेतील वाचकर यांना रीक्षा चालक भास्कर पाटील, विक्की मेढे, रवीकांत पारधे, नितीन धनेकर आदींनी रेल्वे रुग्णालयात दाखल केले. डोक्याला व दोन्ही पायांना अधिक मार लागल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नितीन रमेश धनेकर (नागसेन कॉलनी, कंडारी) डंपर चालकाविरुद्ध (नाव, गाव माहित नाही) शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक वैभव पेठकर करीत आहेत.