पुणे : चांदणी चौकातील भुसारी कॉलेनीनजीक भरधाव जाणार्या डंपरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बीपीओ कंपनीत काम करणार्या अभियंता युवतीसह दोन मुलींना या डंपरने अक्षरशः चिरडले. त्यात युवती जागीच ठार झाली असून, दहावर्षीय चिमुकली उपचारादरम्यान दगावली. तर अन्य एक युवती गंभीर जखमी झालेली आहे. चांदणी चौकातील उतारावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पूजा चव्हाण (23) व निकिता दत्ता नवले (10) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे असून, पूजा ही लोहिया जैन आयटी पार्कमध्ये नोकरी करत होती. शीतल राठोड (23) असे जखमी विद्यार्थिनींचे नाव असून, तिच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तीव्र उतारामुळे होतात अपघात!
तिघींना चिरडल्यानंतर हा डंपर घसरत खाली गेला आणि एका वॅगन-आर कारला धडकून थांबला. पोलिसांनी डंपर चालक तेजू भिकू राठोड यास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या रस्त्यावर असलेल्या तीव्र उतारामुळे अशाप्रकारचे अपघात येथे वारंवार घडत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना दिली. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामाधंद्यानिमित्त जाणारे तसेच विद्यार्थीवर्गाची मोठी तारांबळ झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, बाणेर येथून कोथरुडच्या दिशेने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास येणार्या डंपरने या मुलींना उडविले. या मध्ये चिरडली गेल्याने पूजा चव्हाण या युवतीचा जागीच बळी गेला. तर निकिता नवले ही चिमुरडी उपचारादरम्यान दगावली. शीतल राठोडला सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नागरिकांनी डंपरचालकाला पकडून ठेवले
तेजू भिखू राठोड असे वाहन चालकाचे नाव असून, भरधाव डंपर (क्रमांक एमएच 12, 2494) बाणेर येथून कोथरुडच्या दिशेने येत होता. तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला, डाव्या बाजूने पायी येत असलेल्या तीन मुलींना जाऊन तो धडकला. यामध्ये पूजा ही चिरडली गेली. अपघात झाल्यावर आसपासच्या नागरिकांनी डंपर चालकाला धरुन ठेवले व पोलिस आल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिले. युवतीला धडक दिल्यावर डंपर पुढे गेल्याने तिच्यासोबत असलेल्या अन्य दोघीदेखील गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी वाहन चालकावर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.