रावेर : विना क्रमांकाच्या भरधाव दुचाकीवरून जाताना महिला पडल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात घडलेल्या अपघात प्रकरणी रावेर पोलिसात चाळीसगाव तालुक्यातील उपलखेडा येथील एकाविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिगंबर मल्हारी पवार (45, उपलखेडा, ता.चाळीसगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे तर तापीबाई गौरलाल राठोड (50, जुनोना, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.
नव्या दुचाकीचा जुनोना गावाजवळ अपघात
जुनोना गावातील राजाराम गोरेलाल राठोड (30, जुनोने) यांच्या मालकिची नव्या दुचाकीवरून संशयीत डिगंबर पवर हे तापीबाई राठोड यांना रावेरकडून जुनोना गावाकडे भरधाव वेगाने घेवून येत असताना दुचाकी स्लीप झाली . ही घटना 8 जून 2022 सकाळी 11 वाजता घडली होती.
उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू
या अपघातात तापीबाई राठोड यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना बर्हाणपूरच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र 14 जूनपर्यंत त्यांच्यावर उपचार करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना घरी आणल्यानंतर 15 जून रोजी त्यांचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी रावेर न्यायालयात फिर्याद दिल्यानंतर 156/3 प्रमाणे चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तपास उपनिरीक्षक मनोहर जाधव करीत आहेत.