ऐन दिवाळीत चिंचोल-मेहुण गावावर शोककळा ; दुचाकी चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा
वरणगाव- राष्ट्रीय महामार्गावरील वेस्टन हॉटेलसमोर दोन भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्याने झालेल्या अपघातात चिंचोल मेहूणच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या काळातच तरुणाच्या झालेल्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
दगडाचा फटका बसल्याने युवकाचा मृत्यू
पाटबंधारे विभागाचा कर्मचारी शीतल प्रल्हाद पाटील (33, रा. चिंचोल मेहुण, ता.मुक्ताईनगर) हा मुक्ताईनगरकडून भुसावळकडे दुचाकी (एम.एच.19 ए.एस 5197) ने भरधाव वेगात जात असताना समोरून येणारी तुषार चंद्रकात पाटील व केतन सुनील पाटील (गोळेगाव, ता.बोदवड) यांच्या विना क्रमांकाच्या दुचाकीने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकले गेले. शीतल पाटील यांच्या डोक्याला जबर दगडाचा मार लागल्याने अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर तुषार पाटील व केतन पाटील जखमी झाल्याने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. रमेश श्रावण पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील, अतुल कुमावत, योगेश पाटील तपास करीत आहेत.