भडगाव/भुसावळ : भडगाव-पाचोरा रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या या अपघातात तरुणासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. रात्री उशिरा भडगाव पोलिसात दोघांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.
भरधाव दुचाकी धडकल्याने अपघात
घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर मोरे (25) हा शेतात काम करण्यासाठी सेंधवा येथून सालदार घेऊन येत असतांना पाचोरा-भडगाव दरम्यान मदरसाजवळ समोरुन येणार्या दुचाकींमध्ये मंगळवारी अपघात झाला. या अपघातात दुचाकी (एम.एच.20 डी.एन.5962) वरील रामेश्वर मोरे व सेंधवा येथील निलेश बारेला (25) हा जागीच ठार झाला. अपघातात मयत रामेश्वर मोरे हा घाटनांद्रा येथील शेतकरी असून मंगळवारीच त्याला लग्नासाठी बघायला मुलीकडील मंडळी आली होती. लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच रामेश्वरचा अपघाती मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघाताची वार्ता कळताच मयताच्या गोंदेगाव परीसरातील नातेवाईकांनी पाचोरा काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना ही बातमी कळवल्यानंतर सोमवंशी यांनी तत्काळ भडगाव येथील टायगर ग्रुपचे सद्दाम शेख, जुबेरा मिर्झा, अमीर शेख, बबलू पवार यांना मदत कार्यासाठी पाठवले.