कुर्हेपानाचे जवळील घटना ; बीएससीला प्रवेश घेवून परतताना अपघात
भुसावळ- फर्दापूर येथे बीएएस्सीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून गावाकडे परतणार्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव बोलेरोने धडक दिल्याने पिंपळगाव खुर्दच्या दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कुर्हेपानाचे गावाजवळ मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बोलेरो चालकास अटक करण्यात आली आहे. पराग लक्ष्मण पाटील (23) व वैभव गजानन सरोदे (25, दोन्ही रा.पिंपळगाव खुर्द) अशी मयत तरुणांचे नाव असून या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
भरधाव बोलेरोने उडवल्याने जागीच मृत्यू
पराग व वैभव हे दोन्ही मित्र फर्दापूर येथे बारावी उत्तीर्ण झाल्याने मंगळवारी बीएएसी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी दुचाकी (क्रमांक एम.एच.19 – ए. सी.5557) ने मंगळवारी गेले होते. परतीच्या प्रवासात कुर्हेपानाचे गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील जोगेश्वरी माता मंदिराजवळ बोदवडकडून कुर्हेकडे भरधाव जाणार्या बोलेरो (एम.एच.12- के.जे. 0598) ने दुचाकीला धडक दिल्याने तरुणांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार अक्षरशः हवेत फेकले गेले तर दुचाकीचाही चुराडा झाला. अपघाताची माहिती कळताच कुर्हेपानाचे गावात कळताच ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली.
बोलेरो चालकास अटक
तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले. पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण इंगळे (रा. पिंपळगाव खुर्द), राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष डॉ.दीपक पाटील , किरण चोपडे आदींनी ही घटनास्थळी भेट दिली. बोलेरो चालक राजेंद्र नारायण पाटील (रा.विचवा, ता.बोदवड) याच्याविरुद्ध सायंकाळी उशिरा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. मयत पराग पाटील यांच्या पश्चात आई-वडील व एक मोठा भाऊ तर वैभव सरोदे यांच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परीवार आहे.