अमळनेर – भरधाव लक्झरीने दुचाकीला धडक दिल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ७ वाजता अमळनेर जवळील लोणी फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात संजय युवराज ठाकरे (मूळ राहणार सातरणे, ता. धुळे, ह.मु. आर.के. नगर, अमळनेर) यांचा मृत्यू झाला.
महाविद्यालयात जाताना अपघात
नवलनगरमधील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत ठाकरे हे दुचाकीने ते महविद्यालायत जात असताना लोंढवे फाट्याजवळ धुळ्याकडून येणाऱ्या सिंडिकेट ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (क्र एम एच 19 वाय 6292 ) वरील चालकाचा ताबा सुटला. त्याने दोन विद्युत खांबांना धडक देत दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचा चक्काचूर झाला. सकाळी सात वाजता हा अपघात झाला. संजय ठाकरे यांचा चेहराही ओळखला जात नव्हता. खिशातील आधारकार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली. घटनेचे वृत्त कळताच सातरणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचून लक्झरीची तोडफोड करून वाहतूक अडविली. फोन करूनही पोलीस उशिरा पोहोचल्याचा राग आल्याने काहींनी पोलिसांच्या अंगावर धाव घेऊन त्यांना शिवीगाळ केली तर काहींनी पेट्रोल घेऊन लक्झरी जाळण्याचा प्रयत्न केला. लोंढव्याच्या ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. तब्बल तीन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. संजय ठाकरे हे अपंग होते. त्यांच्या पश्चात आई वडील , पत्नी , मुलगा मुलगी असा परिवार आहे.