भुसावळ : लाकूड वाहतूक करणारा 407 व प्रवासी वाहतूक करणारी अॅपे रीक्षात यांच्यात अपघात होवून तीन प्रवासी जागीच ठार झाले तर एक प्रवासी अत्यवस्थ आहे. हा अपघात भुसावळ-जामनेरदरम्यानच्या गारखेडा गावाजवळ मंगळवारी सकाळी घडला. मयतांमध्ये जामनेरसह नाशिक व कल्याणच्या प्रवाशाचा समावेश आहे. अपघाताची माहिती कळताच जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, तहसीलदार अरुण शेवाळे आदींनी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले.
उतारावर अॅपेला धडकले 407 वाहन
सूत्रांच्या माहितीनुसार नशिराबाद येथील 407 (एम.एच.21-6045) हा जामनेरमार्गे लाकूड घेवून भुसावळकडे येत असताना भुसावळहून प्रवासी घेवून निघालेली अॅपे रीक्षा (एम. एच.19 ए.ई. 9158) यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेनंतर 407 रस्त्याच्या कडेला जावून उलटली तर अॅपेचा पार चेंदामेंदा झाला. या अपघातात अॅपेतील तीन प्रवासी जागीच ठार झाले तर एक प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे शिवाय अन्य आठ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू : 12 जखमी
खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात अॅपेतील प्रवासी तानाजी साळवे (47, कल्याण), दारासिंग पाटील (नाशिक), भावेश अमिनोद्दीन शेख (28, जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला तर विजय धोटे, पार्वताबाई पालवे, कविता पालवे, अलका तानाजी पालवे, सागर समाधान दोडके, शेख चाँद, विष्णू विजय पालवे, मयुर तानाजी पालवे, भाग्यश्री विजय पालवे, शेख रसुल चाँद, अमीनोद्दीन नजोमोद्दीन, मनीष जाधव हे प्रवासी जखमी झाले आहेत.
एस.टी.संप ठरला प्रवाशांच्या जीवावर
सुमारे दिड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एस.टी.कर्मचारी राज्य शासनात महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे मात्र संपाबाबत यशस्वी तोडगा निघत नसल्याने जिल्ह्यात अवैध वाहतूक फोफावली आहे. पोलिस प्रशासनाचा अवैध वाहतुकीचा छुपा आशीर्वाद असल्याने अपघातांची मालिका कायम आहे. अपघातात मयत झालेले प्रवासी विविध रेल्वे स्थानकावर भुसावळात उतरले मात्र जामनेर जाण्यासाठी एस.टी.नसल्याने नाईलाजाने त्यांनी अवैध वाहतुकीचा आसरा घेतला व त्यात त्यांचे प्राण गेल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त करण्यात आली.