अलिबाग । विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन निमित्त रायगड जिल्ह्यातही विद्यार्थ्यांचे फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कुरुळ येथील आरसीएफ विद्यालयाच्या मैदानात फुटबॉल ’किक ऑफ’ करुन या सामन्यांचा प्रारंभ केला. ’भरपुर खेळा आणि शारिरीक, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा’, असा संदेश जिल्हाधिकार्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना दिला. कुरुळ येथील आर.सी.एफ शाळेजवळील मैदानावर आज सकाळी साडेआठ वाजेपासून शाळकरी विद्यार्थ्यांचे फुटबॉल संघ दाखल होऊ लागले होते. येथे आयोजित आटोपशीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सामन्यांचा प्रारंभ केला.
फुटबॉल सामने आयोजित करून खेळाशी जोडण्याची एक चांगली संधी
शालेय जीवनात खेळण्याचे महत्त्व खूप आहे. फुटबॉल हा खेळ आपणही आपल्या शालेय जीवनात खेळत होतो. अशी आठवण सांगून त्यांनी प्रत्येक मुलाने आणि मुलींनी फुटबॉल खेळले पाहिजे. फुटबॉलचे आंतराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात आयोजित करुन खेळाशी जोडण्याची एक चांगली संधी शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. आपण सार्यांनी फुटबॉल खेळून आपली शारिरीक व मानसिक तंदूरुस्ती कमवावी, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
वाडा येथे विष्णू सवरा यांच्या हस्ते शुभारंभ
पालघर । फुटबॉल खेळ महोत्सवाचा वाडा येथील पी.जे. हायस्कूल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी सवरा म्हाणाले की, सदृढ शरीरसाठी फुटबॉल सारखे खेळ आवश्यक आहे, खेळल्याने आपण फिट राहतो. शालेय विद्यार्थ्यांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा. ज्याच्याकडे खिळाडू वृत्ती असते ती व्यक्ती आयुष्यात कधीच मागे राहत नाही. यासाठीच अनेक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.