मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास
धुळे । तालुक्यातील नेर येथील भरवस्तीत असलेल्या जैन गल्लीतील जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज शनिवारी मध्यरात्री चोरून नेला. सोने, चांदीचे दागिने तसेच दानपेटीत असलेले पैसे असा एकूण लाखोचा ऐवज लांबविण्यात आल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट झाले. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली असून भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रात्रीची गस्त घातली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. धुळे तालुक्यातील नेर हे 50 हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. नेरसह पंचक्रोशीतल्या गावांसाठी येथे दूरक्षेत्र पोलीस चौकी आहे. मात्र तेथे पुरेसे पोलीस कर्मचारी नाहीत. आहेत त्या कर्मचार्यांकडून समन्स बजावण्यातच वेळ जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळेच चोरट्यांनी भरवस्तीतील जैन मंदिरात चोरी करण्याचे धाडस केले आहे.
श्वानपथकास पाचारण
रविवारी नेहमीप्रमाणे मंदिराची स्वच्छता करण्यासाठी सकाळी मंदिर उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला. त्यामुळे चोरटे महामार्गावरून वाहनाने पसार झाल्याचा कयास आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातील काही कॅमेरे चोरट्यांनी फोडले. मात्र दानपेटी जवळचा कॅमेरा चोरट्यांना दिसला नाही. त्यामुळे चोरटे या कॅमेर्यात कैद झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सकाळी 11 वाजता भेट दिली. त्यांनी घटनास्थळासह परिसराची पाहणी केली. तसेच नाकाबंदी करण्याच्या सूचना देत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाची दिशा ठरवण्याचे आदेश दिले.
मंदीराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश
मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांनी दुसरा दरवाजा तोडला आहे. भिंतीत असलेले कपाट काढून ते फोडले आणि त्यातून दागिने लांबवले आहेत.