‘भरारी’ फाऊंडेशनतर्फे सामाजिक संवेदना अभियान

0

जळगाव । खान्देशातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी भरारी फाऊंडेशनच्यावतीने शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकरी कुटुंबातील विवाहयोग्य मुलींचा विवाह, या कुटुंबातील मुलांना मदत देवून त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण सहाय्य करण्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षापासून प्रतिवर्षी 100 मुलांना मदत देऊन त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च भरारी फाऊंडेशनच्यावतीने उचलण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात राज्यभरात तसेच जळगाव जिल्ह्यात शेतकर्‍यांवर आसमानी आणि सुलतानी संकटांनी घेराव घातला होता. ही सर्व परिस्थिती पाहता भरारी फाऊंडेशनच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

शैक्षणिक साहित्य व अर्थसहाय्य वाटप
25 जून सकाळी 10 वाजता रोटरी हॉल गणपती नगर येथे सामाजिक संवेदना जागृती सोहळा आयोजित करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 110 मुलांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य व अर्थसहाय्य देणार्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, सामाजिक कार्यकर्ते भरत अमळकर, अनिल भोकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेती पूरक व्यवसाय मार्गदर्शन
आपला पती गेल्यानंतर शेती व्यवसायाची समर्थपणे धुरा हाती घेणार्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना शेती पूरक व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण व त्यासाठी लागणारी मदत देणार्या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. संवेदना जागृती सोहळ्यासाठी संजय शहा, अध्यक्ष रोटरी क्लब जळगाव, रजनिकांत कोठारी, नरेश खंडेलवाल, नंदलाल गादीया, सपन झुनझुनवाला, वासुदेव पारपियानी, दिनेश टाटीया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. भरारी फाऊंडेशनच्या शेतकरी अभियानाच्या या उपक्रमास सामाजिक, दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.