भर दुपारी दहा लाख लुटताना चोरटा रंगेहाथ सापडला

0

पिंपरी-चिंचवड : बडोदा बँकेतून दहा लाखांची रोकड घेऊन बाहेर पडलेल्या एका व्यावसायिकाला हत्याराचा धाक दाखवत पिशवी पळवून देणार्‍यास नागरिकांनी पकडले. पिंपरी येथील कमला क्रॉस बिल्डींगच्या आवारात शुक्रवारी दुपारी तीनला घडला. संतप्त नागरिकांनी चोरट्याची बेदम धुलाई करत पिंपरी पोलिसांच्या स्वाधीन केले. मनोज मुंडे (वय.25 रा.मुखेड नांदेड) असे या चोरट्याचे नाव आहे.

दोघेजण पसार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेसमोर असलेल्या ज्वेल ऑफ कमला क्रॉस बिल्डींगमधील बडोदा बँकेत शुक्रवारी दुपारी एक व्यावसायिक मोठी रक्कम काढण्यासाठी आला होता. सुमारे दहा लाख बँकेतून काढून, एका पिशवीत ठेवून मोटारीकडे निघालेला असता बँकेच्या बाहेर पायर्‍यांवर दबा धरून बसलेल्या चोरट्याने त्यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावली आणि पळून जाऊ लागला. यावेळी व्यवसायिकाने आरडाओरडा केला. दरम्यान त्या ठिकाणी असणार्‍या नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. मात्र चोरी करण्यासाठी तिघेजण आले होते. घडलेला प्रकार पाहून यातील दोघे जण दुचाकीवरुन पसार झाले.

बेदम मारहाण
संतप्त नागरिकांनी चोरट्याला बेदम मारहाण करून पिंपरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतले. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने भीतीचे वातावरण पसरले. संबंधीत आरोपीला पोलिसांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.