भुसावळ/धुळे : घर भाड्याने न दिल्याच्या कारणावरून धुळे शहरातील 35 वर्षीय सफाई कामगार युवकाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी राजीव गांधी नगरात घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रवींद्र काशीनाथ पगारे (35, रा.राजीव गांधी नगर, भीम नगर परीसर, धुळे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर संशयीत आरोपी जय उर्फ दादा वाल्मीक मोरे (26, राजीव गांधी नगर, साक्री रोड, धुळे) यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा दाखल करण्यात आला.
घर भाड्याने न दिल्याने केला खून
मयत रवींद्र पगारे यांचे बंधू भटू काशीनाथ पगारे यांचे राजीव गांधी नगरातील घरे भाडे तत्वावर संशयीत जय मोरे यास न मिळाल्याने त्याबाबत त्याच्या डोक्यात राग होता व रागातून आरोपी जयने सोमवारी सायंकाळी भीम नगर परीसरातील राजीव गांधी नगरात राहणाार्या रवींद्र पगारे यांच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केला व हा वार वर्मी बसल्याने जागीच पगारे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयीत पसार झाला मात्र रात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. रात्री उशिरा या प्रकरणी कविता रवींद्र पगारे (साक्री रोड, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी जय उर्फ दादा वाल्मीक मोरे (26, राजीव गांधी नगर, साक्री रोड, धुळे) विरोधात भाग पाच गुरनं.704/2021 भादंवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
दरम्यान, तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळाल्यांतर पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, अधिकारी तिगोटे, उपनिरीक्षक कैलास दामोदर, कर्मचारी मुख्तार मन्सुरी, सतीश कोठावदे, खेडकर, विलास भामरे, अविनाश कराड, जितेंद्र सोनार व पथकाने धाव घेतली.