भवन मोडले पण चळवळ कायम!

0

दलित चळवळीनंतर आंबेडकरी चळवळीला बाळकडू देणार्‍या मुंबईतील आंबेडकर भवनाच्या पाडकामास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या एक वर्षाच्या कालखंडात आजही आंबेडकर भवन जैसे थेच आहे. या पडक्या भवनातुनही आजची तरुणांनी आपल्यापरीने चर्चासत्रे, आंबेडकरी चळवळ, मार्गदर्शने सुरू ठेवलेली आहेत. भवन पाडल्यानंतरही या ठिकाणी आजही राज्यासह देशविदेशांतील आंबेडकरी अनुयायी भवनाला पाहण्यासाठी येत आहेत. 25 जून 2016 रोजी आंबेडकर भवन जमीनदोस्त केले. या आठवणींना आज एक वर्ष पूर्ण झाले. आजही त्या ठिकाणी गेल्यावर घडलेल्या घटना डोळ्यासमोर येत असल्याची खंत भवनातील कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केली. या तोडक कारवाईमुळे आजही राज्यभरातील आंबेडकर अनुयायींमध्ये पीपल्स इम्र्पूव्हमेन्ट ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांविरोधात संताप आहे. यांची प्रचिती औरंगाबाद येथे माजी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनी केलेल्या बेदम मारहाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आली. मुंबईच्या दादर पश्‍चिमेतील नायगाव येथे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन 25 जून, 2016 रोजी मध्य रात्री 2.30 वाजेच्या सुमारास ट्रस्टमधील पदाधिकार्‍यांनी 400 ते 500 गुंडांना हाताशी धरून दोन जेसीबी आणून उद्ध्वस्त केले. आंबेडकर भवन उद्ध्वस्त केल्यानंतर पीपल्स इम्र्पूव्हमेन्ट ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांविरोधात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. परंतु, यापैकी एकालाही अटक करण्यात आली नाही.

भवन तोडण्याची सर्व कल्पना देऊनही भायखळा पोलिसांनी त्यांची कुठलीही दखल घेतली नव्हती. तो आधीच केलेला प्लॅन होता की काय? असा संशय आता आंबेडकरी जनतेला वाटत आहे. भवन पाडण्यास सर्वस्वी भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. सध्याच्या घडीला आंबेडकर भवनाचा वाद न्यायालयात सुरू आहे. आंबेडकर भवन पाडकामाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. उर्वरित बांधकामांना लाकडी टेकू लावण्यात आले आहे. पाडकामानंतरचे डेब्रीज आहे तिथेच पडलेले आहे. या डेब्रीजवर मोडक्या खुर्च्या, पंखे, संगणक, बांबूचे तुकडे इतरत्र पसरलेले आहेत, तर भवनात नेहमीप्रमाणे बुक स्टॉल, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासंघ यांची कार्यालये सुरळीतपणे सुरू आहेत. उरलेल्या बांधकामाला प्लास्टिकने झाकण्यात आले आहे. यामुळे तोडक कारवायानंतर वाचलेल्या जागेवर सामाजिक, सांस्कृृतिक, राजकीय आणि इतर चळवळीचे कार्य कमी प्रमाणात सुरू आहेत. पावसाळा सुरू झाल्याने, भवनातील वाचलेल्या ऐतिहासिक वस्तू, पुस्तके, बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेसला प्लास्टिकने झाकण्यात आले आहे. न्यायालयात भवनाची सुनावणी सुरू असल्याकारणाने भवनामध्ये आणि बाहेर कुठलेही बांधकाम करता येत नाही. यामुळे येथील डेब्रीज उचलण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. आंबेडकर भवन पाडणार्‍यांवर शासन आणि न्यायव्यवस्था कडक कारवाई करेल. परंतु, तसे काहीच झाले नाही. घटना घडून एक वर्षाचा कार्यकाल उलटल्यानंतरही भायखळा पोलिसांनी अद्यापही चार्जशीट दाखल केलेली नाही. यामुळे पोलीस हे आरोपीच्या हाताचे बाहुले झाले की काय? असा सवाल आता आंबेडकरी जनता विचारू लागली आहे.

जमीनदोस्त केलेल्या आंबेडकर भवनातील बुद्ध भूषण प्रिंटिंग मशीन, भारिप बहुजन पक्षाचे कार्यालय, रिपब्लिकन सेना, यशोधरा संगणक सेंटर, डॉ.आंबेडकर बुक सेंटर, पंखे, खुर्च्या आणि डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली आणि विकत घेतलेली ऐतिहासिक मासिके, ग्रंथ, वृृत्तपत्रे इत्यादिंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुद्दा हा आहे की, इमारत पाडण्याचा प्रयत्न झाला तरी विचार आणि कार्यकर्त्यांची त्या वास्तूवरील श्रद्धा कोणतीही दडपशाही यंत्रणा मोडू शकली नाही. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी आणि लोकशाहीवादी विचारांवरील श्रद्धा त्यांच्या अनुयायांमध्ये कायम आहे. ती कोणीही संपवू शकत नाही. पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा लढाया खूप झाल्या. मात्र, इथे आपापसातील लढ्याने वेगळे वळण घेतले. म्हणजेच विचार हा जातीवर अवलंबून नसतो, तर तो प्रवृत्तीवर अवलंबून असतो, हेच या घटनेतून स्पष्ट होते. पुन्हा येथे मोठी वास्तू उभीही राहील कदाचित. मात्र, त्यादरम्यान तुटलेली मने जुळणार का आणि ओरिजनल ऐतिहासिक ठेवा पाहायला मिळणार आहे का? ही घटना सर्वांनाच त्यांच्या भावनिक प्रतिबध्दतेला आव्हान वाटत असल्याने तिचे गांभीर्य वाढले आहे, असे म्हणावे लागेल.याचा सरकारने विचार करणे महत्वाचे आहे.

– प्रथम गायकवाड
मो.9920538839