जळगाव । अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त शहरातील पिंप्राळा भवानी मातेच्या जयघोषात बारागाड्यांचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. पिंप्राळ्यात भगत हिलाल बोरसे यांना बारागाड्या ओढण्याचा मान मिळाला. बारागाड्या पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणार्या अक्षय्यतृतीयेला भवानीमातेच्या यात्रोत्सवानिमीत्त पिंप्राळा परिसरात बारागाड्यांचा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवाने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. भवानी मातेच्या जयघोष करीत पिंप्राळा बारागाड्या उत्साहात भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त पिंप्राळ्यात बारागाड्या ओढण्यात आल्या.
पाणी, सरबतवाटप
पिंप्राळा परिसरात भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त बारागाड्या ओढल्या जातात. त्यानिमीत्त विविध सामाजिक संस्था व परिसरातील नागरीकांतर्फे पाणी व सरबत वाटप करण्यात आले. भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त ओढण्यात येणार्या बारागाड्यांच्या उत्सावात भवानी मातेचा जयघोष करण्यात आला. गुलालाची व भंडार्याची उधळण करण्यात आली. यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
पुलापासून तलाठी कार्यालयापर्यत…
सुरुवातीला ध्वजकाठीचे विधिवत पुजन झाले. त्यानंतर भगत हिलाल बोरसे यांच्यासह भक्तांनी ध्वजासोबत भवानी मातेच्या मंदिराला अकरा प्रदक्षणा घातल्या. त्यानंतर आ. राजूमामा भोळे, पोलिस पाटील विष्णू पाटील यांच्या हस्ते बारागाड्यांचे पूजन करण्यात आले. यानंतर भगतासह भाविकांनी बारागाड्यांना पाच प्रदक्षण मारल्यानंतर बारागाड्या महामार्गाच्या पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी भगत भाऊलाल भोई, आनंदा बोरसे, सुकलाल चौधरी, दिलीप कोळी, गोविंदा बोरसे यांच्यासह पुरुषोत्तम सोनार, जगन्नाथ मिस्त्री, दामू भिल, सुभाष पाटील, भागवत मिस्त्री, दिपक मिस्त्री यांनी परिश्रम घेतले. भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त शहरातील पिंप्राळा उपनगरात बारागाड्या ओढण्यात आल्या. हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरीक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
मेहरुण परिसरात जल्लोष
भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमीत्त शहरातील मेहरुण परिसरात देखील बारागाड्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 7.00 वाजता भगत मधुकर वाघ यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी महापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर नगरसेवक सुनिल महाजन, नगरसेवक इक्बाल पिरजादे, गणेश सोनवणे आदींची उपस्थिती होती. सदोबा वेअर हाऊस पासून ते भवानी मातेच्या मंदिरापर्यंत ही बारागाडी ओढण्यात आली. भगत मधुकर वाघ हे गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून बारागाड्या ओढत आहे.