भविष्यात निवडणूक लढवणार नाही

0

जळगाव। शहर अधिक सुंदर, स्वच्छ व हिरवेगार कसे करता येईल यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. जळगावकरांनी आपल्याला 9 वेळा आमदार करीत भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढणार नसल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रविवारी सांगितले. लायन्स क्लब सेंट्रल तर्फे बहिणाबाई उद्यानातील निकामी खेळण्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण केल्यानंतर या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा बहिणाबाई उद्यानात झाला. यावेळी सुरेशदादा बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा, लायन्स क्लबचे सुगोन मुणोत, पुनम अग्रवाल, अनिल पगारीया उपस्थित होते. सुरेशदादा म्हणाले की, शासनाच्या निधीचा वापर विकासकामांसाठी नियोजनबध्दरित्या झाला पाहिजे. शहरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजुला करून केवळ विकासाचा मुद्दा पुढे करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार सुरेश भोळे यांना भिती बाळगण्याची गरज नाही. भविष्यात मी निवडणूक लढविणार नसल्याचे सुरेशदादा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर कार्यक्रमात एकच हंशा पिकला. मी 9 वेळा शहराचा आमदार राहिलो आहे, जळगावकरांनी भरपूर प्रेम दिले असल्याचेही ते म्हणाले.