डॉ. सोंडे : 33 व्या राष्ट्रीय रसायन अभियंता परिषदेचे उद्घाटन
पुणे । पुढील काळात सर्वच उद्योगांना मोठ्या बदलांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशोधन करताना येणार्या अडचणी सोडवताना विविध वैज्ञानिक पर्याय वापरण्याची गरज आहे. सध्या वातावरणातील बदल, स्तोत्रांची उपलब्धता अशा काळात नॅनो तंत्रज्ञान भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, असे मत थरमॅक्सच्या संशोधन व विभागाचे उपाध्यक्ष डॉ. आर. आर. सोंडे यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनिअर्सच्या रसायन अभियंता विभाग आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 33 व्या राष्ट्रीय रसायन अभियंता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सोंडे बोलत होते. या परिषदेत ”नॅनोटेक्नोलॉजी आणि त्याच्या विविध वापरातून रासायनिक उद्योगांचा विकास” यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. मुरली रेड्डी, पी. पी. अगरवाल, गिरीश मुंदडा, डॉ. जयेश बेल्लार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन प्रबंध पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
संशोधनातून नवनिर्मितीचे अविष्कार
वैज्ञानिक प्रयोगशाळेत जे काही प्रयोग करतात त्याचे परिणाम समाजावर होत असतात. परंतु, या संशोधनातून नवनिर्मितीचे अविष्कार होत असतात. अलीकडच्या काळात नॅनो तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या परंपरागत ज्ञानाचाही यासाठी वापर केल्यास जागतिक स्तरावर त्याचा फायदा होईल. यावर अधिक संशोधन झाले, तर आरोग्यासह इतर सुविधा स्वस्त होण्यासही त्याची मदत होईल, असे डॉ. सोंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
रसायन अभियांत्रिकीतील संशोधकांचा सन्मान
केमिकल इंजिनिअरींग क्षेत्रात संशाधन आणि कार्य करून अतुलनीय योगदान दिलेल्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. यशवंत घारपुरे, डॉ. बी. डी. कुलकर्णी, डॉ. आर. भीमा राव, डॉ सुगंधा गारवे यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय या क्षेत्रात काम करणार्या तरुण संशोधकांना ’यंग अचिव्हर्स पुरस्करा’ने गौरविण्यात आले. त्यात डॉ. आर. अनंतराज, डॉ दिनेश भाटिया आणि डॉ मोहम्मद हैदर अली यांचा समावेश होता.