जळगाव: शहराजवळील पाळधी गावानजीक अडीच एकराच्या विस्तीर्ण अशा मणियार इस्टेट परिसरात भारतातील सर्वात उंच काळ्या पाषाणातील श्री सिध्दी महागणपती मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी श्री सिद्धी महागणपती देवस्थान व श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान परिश्रम घेत आहे.
गणेशमूर्तीच्या पायामध्ये 21 कोटी बिजाक्षरी गणेशमंत्राच्या प्रती ठेवण्यात येणार आहे. पावन कार्याला आपलाही हातभार लागावा यासाठी गणेशमंत्र लिखाणासाठी पुस्तक मिळविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री सिद्धी महागणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी गत पाच वर्षापासून तामीळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील पाषाणाच्या विविध खाणी अथक परिश्रमाने पिंजून काढल्यानंतर ग्रेनाईटचा अखंड काळा पाषाण आंध्र प्रदेशातील विजयवाडापासून 120 किलोमीटर दूर अतिदुर्गम भागात खाणीत आढळला. हा पाषाण 3740 क्युबिक फुट इतका प्रचंड मोठा आहे. आकारमानावरुन वजनाचे सूत्र लावल्यास दहा क्युबीक फुट म्हणजे एक टन वजन होते. 3740 क्युबिक फुट म्हणजे तब्बल 374 टन येवढे प्रचंड वजन या पाषाणाचे आहे. या भल्यामोठ्या वजनाच्या पाषाणाची जळगावपर्यंत वाहतूक करणे अशक्य असल्याने खाणीच्या ठिकाणीच 70 मूर्तीकार 31 फुटांहून अधिक उंच अशी भव्य श्री सिद्धी महागणपतीची मूर्ती साकारत आहेत. त्यासाठी नुकत्याच एका मुहूर्तावर विधीवत मंत्रोच्चारात पाषाण पूजन करण्यात आलेे.
अशी असेल मूर्ती
प्रस्तावित श्री सिद्धी महागणपतीची मूर्ती कदाचित भारतातीलच नव्हे तर आशियातली पहिलीच मूर्ती असावी. ही मूर्ती दक्षिण शैलीची व उजव्या सोंडेची आहे. गणपतीच्या हातात लाडू, पाश व अंकुश असतात, याशिवाय या मूर्तीच्या हातात दंत असेल. उजव्या सोंडेमध्ये अमृतकुंभ धारण करणार आहे. दंत आणि अमृतकुंभ हे या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. मूर्तीच्या आकारमानाला शोभेल असा सुमारे सव्वा सहा फुटाचा मुषकराज सुद्धा विशेष आकर्षण असेल.
मंदिराचा 105 फुटाहून अधिक उंच कळस
मूर्तीच्या आकारमानाला साजेसे भव्य मंदिर प्रस्तावित आहे. मंदिराचा कळस हा सुमारे 105 फुटांहून अधिक उंच राहील त्यामुळे भाविकांना मंदिराचे दर्शन अगदी दूरवरून होणार आहे. प्रवेशव्दार (राजगोपुरम) सुमारे 150 फुटाहून अधिक उंच राहील. भारतातील वैशिष्टयपूर्ण गणपती देवस्थान म्हणून हे क्षेत्र नक्कीच आपली ओळख निर्माण करेल. देवालयाचे गर्भगृह 54 फुटांहून अधिक उंच व 51 बाय 51 फुटाचे भव्य असेल. त्यात सुमारे 31 फुटाची काळ्या पाषाणातील भव्य अशी बैठी श्री सिद्धी महागणपती मुर्ती विराजमान झालेली खूप सुरेख दिसेल. 15 हजार चौरस फुटांचा भव्य सभामंडप असणार आहे.