मुंबई : ठाकरे कुटुंबातून पहिला व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात आहे. सक्रीय राजकारणात आजपर्यंत ठाकरे कुटुंबियांचा सहभाग नव्हता, मात्र यंदा शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आज गुरुवारी ३ रोजी आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
दरम्यान आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेचे आभार मानले. तसेच मनसेने आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याबाबत विचारले असता देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांचे आभार मानले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचे विशेष आभार मानले.
आदित्य ठाकरेंकडे करोडोची संपत्ती
आज उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरे यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली. आदित्य ठाकरेंची संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये आहे. त्यात १० कोटी ३६ लाख बँक ठेवी, २० लाख ३९ हजारांचे बॉंड शेअर्स, बीएमडब्ल्यू कार, ६४ लाख ६५ हजारांचे दागिने अशी संपत्ती आदित्य ठाकरेंची आहे.