यावल: – परीक्षा केंद्रावर का फिरत होता? कुणासाठी तेथे गेला होता? असे म्हणत यावल तालूक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायतीसमोर तिघांनी एकाशी वाद घातला तर भांडण सोडवण्यास गेलेल्या दोघांना जबर मारहाण करीत डोके फोडले. घटनेनंतर जखमींसह गावातील नागरीकांनी यावल पोलिस ठाण्यात गर्दी केली व संबधीताविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
सचिन भरत बाविस्कर (रा. दहिगाव) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते शेतातुन दहिगावात परतले असता ग्रामपंचायत चौकात विशाल कमलाकर भालेराव यास गावातील काही जण मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा ते व अमोल दिलीप अडकमोल हे दोघे भांडण सोडवण्याकरीता गेले तेव्हा गावातीलच भगवान राजेंद्र पाटील याने त्याच्या हातातील कपाशी उपटण्याचा लोंखडी चिमट्याने अमोल भालेराव व सचिन बाविस्कर यांना मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. वाद वाढल्याचे पाहुन गावातील नागरीकांनी जखमी अवस्थेत तिघांना तत्काळ यावल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती तर वाद अधिक वाढु नये याकरीता रिपाईचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, तालुकाध्यक्ष अरूण गजरे, दहिगावचे किशोर पाटील नागरीकांना शांत केले. या प्रकरणी भगवान राजेंद्र पाटील, शेनफडू दोधू पाटील व दिलीप दोधु पाटील (रा. दहिगाव) यांच्या विरूध्द जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक एम. जे. मोरे, हवालदार पांडूरंग सपकाळे करीत आहे.