भांडवल कशाला करतात ? सिंधुताईकडून इंदोरीकरांची पाठराखण

0

मुंबई: गेल्या काही दिवसापासून कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या वक्तव्यावरून राज्यात आठ दिवसापासून वाद सुरु आहे. या वादात आता समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी उडी घेत इंदोरीकर महाराजाची पाठराखण केली आहे. इंदोरीकर महाराजांकडून कीर्तनामध्ये पौराणिक दाखले देत असताना एखादे वाक्य चुकीचे गेले असेल तर त्याचे एवढे कशाला भांडवल करता? असा सवाल सिंधुताई सकपाळ यांनी केला आहे. तसेच हा वाद विनाकारण वाढवला जात असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. हे प्रकरण वाढत असल्यामुळे अखेर सात दिवसानंतर इंदोरीकर महाराजांनी लेखी माफीही मागितली होती. इंदोरीकरांनी माफी मागितल्यानंतर सिंधुताई सकपाळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

इंदोरीकरांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला करत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. त्यांनी वाईट-रुढी परंपरा जाव्यात म्हणूनही प्रयत्न केले आहेत. अशावेळी त्यांच्याकडून एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल तर त्याचं भांडवल करण्याची गरज नाही. इंदोरीकरांनीही आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरू ठेवावं, असा सल्ला सिंधुताईंनी दिला आहे.