भांडुपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे भाजपमध्ये प्रवेश

0

मुंबई । भांडुपमधील युवा नेते तसेच राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना पाटील यांचे पुतणे कौशिक कमलाकर पाटील व जागृती पाटील यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसमवेत भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भांडुपच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसला मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू होती, मात्र अखेर पाटील यांनी अधिकृत प्रवेश केल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

खिळखिळे करण्याचा प्रयत्न
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत कौशिक पाटील यांच्या मातोश्री प्रमिला पाटील यांनी आमदार अशोक पाटील यांच्या पत्नीचा पराभव करून आपला राजकीय पाया भक्कमपणे रोवला होता, मात्र काही महिन्यांमध्येच प्रमिलाताईंच्या झालेल्या अकाली निधनाने पक्ष कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा कौशिक पाटील यांना भाजपच्या गळाला लावून स्थानिक पातळीवरसुद्धा काँग्रेस खिळखिळी करण्याचे प्रयत्न कार्यकत्यांमार्फत अनेक दिवसांपासून सुरू होते, त्यांचे प्रयत्न आता फळाला आल्याचे पाहायला मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणूक टार्गेट
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी हा पक्षप्रवेश केल्याचे बोलले जात असून, भाजपनेही त्यांना ही ऑफर दिल्याचे कळते. परंतु अजूनतरी त्यांना कुठलीही जबाबदारी दिली नसून, योग्य वेळी त्यांचा राजकीय फायदा उचलण्याची रणनीती भाजपची असल्याचे एका भाजप कार्यकर्त्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. यावेळी आशिष शेलार , भाजपचे गटनेते मनोज कोटक, भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.