पिंपरी-चिंचवड (श्याम सोनवणे) : पत्रकार जसं एखाद्याला वाल्ह्याचा वाल्मिकी करू शकतात तसेच ते वाल्मिकीचा वाल्ह्याही करू शकतात. मी, महेशदादा फास्ट बॉलर, आझमभाईंसारखा कॅप्टन आणि तुम्ही तयार केलेले पीच त्यामुळे चांगली बॉलिंग करत सताधार्यांच्या विकेट्स सहज घेता आल्या. पत्रकारांशी आपले सलोख्याचे संबंध अधोरेखीत करतानाच शहरात भाजपची सत्ता स्थापित होण्याचे श्रेयही आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांना देऊन टाकले. पत्रकार हल्लाविरोधी कायदा संमत झाल्यामुळे पत्रकारांच्या हिताचे व लेखणी स्वातंत्र्याचे रक्षण होईल. यातूनच एक सुदृढ समाज निर्माण होईल, असे मतही त्यांनी मांडले. अशी स्तुतिसुमने उधळत असलेल्या भाऊंनी याच दिवशी रागआलापही आवळला.
दालनावरून नवा वाद
त्याचे झाले असे की, महापालिकेत सद्यस्थितीत दालनांवरून रणकंदन सुरू आहे. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सदस्य संख्या अधिक असल्याने मोठ्या दालनाची मागणी केलेली आहे. मात्र, भाजपने त्यांना कोलदांडा दाखवत झुलवत ठेवले असून, आहे ते दालन माथी मारले जात आहे. वरून अनाठायी खर्च कमी करायचा, विविध भत्ते, वाहन, चालक घ्यायचा नाही असा मुलामा चढविण्यात आला आहे. त्यातच पेपरलेस कारभारासाठी पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, दालन वादाचा धुरळा अद्याप शांत झालेला नाही; त्यातच स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासकीय इमारतीच्या तिसर्या माळ्यावर पत्रकारांसाठी असलेले चिंचोळे दालन आपल्याला मिळावे, यासाठी घाट घातलेला असून, नव्या वादाला तोंड फुटले आहेे. पत्रकारांनी ही बाब भाऊंच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सावळेंना त्यांच्या पद्धतीने द्यायची ती समज दिली असल्याचे सांगितले जात आहे.
नेमके गौडबंगाल काय?
सावळे यांना त्यांच्या दालनाची कक्षा वाढवून घ्यायची असल्याने हा अट्टाहास केला जात असल्याचे सांगितले जात आहे. तर त्यांच्या दालनात कोण येतं-जातं यावर कोणी नजर ठेऊ नये यासाठी हा प्रकार चालवला जात असल्याचेही चर्चिले जात आहे. वास्तविक सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यानंतर सावळे यांनी वाहन, चालक घेणार नसल्याची घोषणा केली. त्यात स्थायीचे अध्यक्षपद असल्याने महापालिकेचा खर्च कमी करून आर्थिक स्त्रोत्र वाढवत करदात्यांशी प्रामाणिक राहण्याची व पारदर्शक कारभाराची गर्जनाही त्यांनी केलेली आहे. स्थायीची पहिलीच बैठक त्यांनी गाजवली आणि विविध विभागांची व अधिकारी कर्मचार्यांची चांगलीच झाडाझडतीही घेतली. अशा प्रकारे आदर्श घालून देत असलेल्या सावळेंना दालनाच्या विस्ताराची गरजच काय असा, प्रश्न उपस्थित केला जात असून, हे पत्रकार दालन त्यांच्या दालनात विलीन होते की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ता.क.: भाऊंनी ताईंना काय सांगितले याची बाहेर काही एक वाच्यता नाही. त्यात भाऊंनी महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, पत्रकार परिषद, उद्घाटन याबाबत सांगूनही एसएमएसद्वारे माहिती देत नसलेल्या एका अधिकार्याचीही चारचौघात चांगलीच खरडपट्टी काढत कानउघाडणी केली. स्तुतिसुमने उधळणार्या भाऊंनी आवळलेला रागआलापही पहायला मिळाला.