जळगाव । काव्यरत्नावली चौकातील भाऊच्या उद्यानात आता जेष्ठ नागरीकांसाठी तसेच साहित्यिकांसाठी प्रशस्त ग्रंथालय तसेच लहान मुलांच्या मनोरंजनात आणखी भर पाडण्यासाठी मोठा कारंजा बसविला जाणार आहे. या कामाला आज प्रत्यक्षात सुरवात झाली असून ग्रंथालय व कारंजा तयार करण्यासाठी नियोजीत जागेवरची महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे जूने विश्रामगृह आज जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पाडण्यात आले. महापालिकेच्या सौजन्याने तसेच जैन इरिगेशनच्या मदतीने काव्यरत्नवाली चौकात उद्यानासाठी आरक्षीत जागेवर भाउचे उद्यान विकसीत करण्यात आले. परंतू उद्यानाच्या काही भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचे असलेले जूने विश्रामगृहाचे बांधकाम होते. याबाबत महापौरांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मनपाच्या जागेवरील मजीप्रचे बांधकाम असल्याने ही जागा ताब्यात व बांधकाम पांडण्यासाठी मिळण्यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार पालकमंत्री यांचेकडून रितसर परवानगी मिळाली असून याबाबत सोमवार 10 रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मजीप्रचे अधिकारी श्री. निकम व महापालिकेचे शहर अभियंता सुनील भोळे यांना आदेश देवून बांधकाम पाडण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार महापालिकेच्या जेसीपी, मजीप्रचे अधिकारी तसेच जैन इरिगेशन कंपनीने यंत्रणेसोबत कामाला त्वरीत दुपारी सुरवात करण्यात आली. शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या उद्यानात वैचारिक ठेवा अनुभवता येईल.
ग्रंथालयाचा सर्वांना लाभ
भाऊच्या उद्यानात कलावंतासाठी मिनी ऍम्पी थेटर, कलाकाराच्या कला प्रदर्शनासाठी कॉरीडॉर तयार केले आहे. त्यातच आता उद्यानात प्रशस्त ग्रंथालय होणार असून त्यात जेष्ठ नागरीकांपासून ते युवा पिढी तसेच साहित्यांना याचा लाभ या ग्रंथालयातून मिळणार आहे. भाऊच्या उद्यानाचे मागे मनपाच्या असलेल्या जागेवर मजिप्रचे विश्रामगृह पाडण्याचे कामाला सुरवात झाली आहे. या जागेवर प्रशस्त ग्रंथालय सोबतच 30 लाख रुपयाचा मोठा कारंजा (फाउंटन) उभारला जाणार आहे. त्यामुळे उद्यानात येणार्या नागरिक तसेच लहान मुलांच्या मनोरंजनात आणखी भर पडणार आहे अशी माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.