साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल
साक्री । भाऊबंदकीचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने संतापाच्या भरात एका पोलीस पाटलाने चक्क साक्री पोलीस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी घडल्याने एकच खळबळ उडाली होती. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस पाटलांना तात्काळ साक्री ग्रामीण इस्पितळात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काळगावचे पोलीस पाटील शांताराम सुपडू देसले यांचा काल रात्री भाऊ बबन सुपडू देसले व पुतणे भूषण जगन्नाथ देसले, विनोद जगन्नाथ देसले यांच्याशी वाद झाला होता. हे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर जबाब घेत असतांना पोलिसांच्या आवारात घटना घडल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलिसांचा हलगर्जीपणा आला चव्हाट्यावर
दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना आज सकाळी १० वाजता साक्री पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी बोलविण्यात आले होते. दरम्यान, शांताराम देसले यांचीही विचारपूस सुरु असतांना ते अचानक दालनातून बाहेर पडले. मानसिक त्रास झालेल्या शांताराम देसले यांनी टोकाचा निर्णय घेण्याचे अगोदरच ठरविलेले होते. ते सोबत किटकनाशक घेवून आले होते. ते त्यांनी कोणाच्या लक्षात येण्याच्या आतच प्राशन केले. किटकनाशक प्यायल्यानंतर ते पोलीस निरीक्षक आर.एस. पाटील यांच्या दालनात परतले. काही वेळातच त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले. तोंडातून फेस येवू लागताच त्यांनी विष पिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लागलीच त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, या घटनेने साक्री तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. एका पोलीस पाटलानेच पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलीस स्टेशनच्या आवारातच ही घटना घडल्याने पोलिसांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडल्याने पोलिसांवर टीका होत आहे.