भाऊबीज’ योजनेतून 110 मुलींना आर्थिक मदत

0

रेडा । इंदापूर तालुक्यात शिक्षण घेत असणार्‍या उपेक्षित व गरीब कुटुंबातील मुलींना आधार देण्यासाठी, चालू वर्षी सुरू करण्यात आलेल्या भाऊबीज शिक्षण योजनेतून 110 मुलींना आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहीती जयहींद फाउंडेशनचे प्रमुख व इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी दिली.

जय हिंद फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी शहाजीनगरमधील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यात रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मयूरसिंह पाटील बोलत होते. अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या गरीब कुटुंबातील मुलींना 1 लाख 75 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून भाऊबीज शिक्षण योजनेची संकल्पना पुढे आली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

अनेक मुलींना आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण घेताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा मुलींना या योजनेतून आर्थिक मदत केली जात आहे. समाजातील अनेक दानशूर लोकांनी या योजनेसाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच आज महिलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर गरीब महिलांच्या उपचारासाठी काही प्रमाणात मदत करण्याची भूमिका अनेक डॉक्टरांनी घेतली आहे. म्हणून आर्थिकदृष्ट्या गरीब महिला रुग्णांसाठी लवकरच भाऊबीज आरोग्य मदत योजना सुरू करण्याचा मनोदयही मयूरसिंह पाटील यांनी यावेळी जाहीर केला.