पुणे : भाऊसाहेब रंगारी यांनीच पहिल्यांदा गणेशोत्सवाला सुरुवात केली व लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा प्रसार केला, हे मुक्ता टिळक यांनी मान्य केल्याची एक ध्वनिफित भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केली. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हात भाऊसाहेब रंगारी यांचे छायाचित्र वापरण्यास कोणी विरोध केला, याचे उत्तर महौपर मुक्ता टिळक यांनी द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच महापौरांनी यंदाचे सार्वजनिक गणेश उत्सवाचे 126 वे वर्ष जाहीर न केल्यास भाऊसाहेब रंगारी मंडळ 20 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याचेही मंडळाचे विश्वस्त सुरज रेणूसे यांनी सांगितले.
फोटो दिला पण छापला नाही
गेले अनेक दिवसांपासून पुणे महानगरपालिका, भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट यांच्यात गणेशोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षावरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला मंडळ ट्रस्टचे विश्वस्त रेणूसे यांच्यासह सचिव राजेंद्र गुप्ता, सहसचिव दिलीप आडकर, खजिनदार आनंद कुसुरकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सुरज रेणूसे म्हणाले, गणेशोत्सवाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महापौरांसोबत झालेल्या बैठकीत भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो पालिकेला देण्यात आला होता. मात्र तो छापण्यात आलेला नाही. काही मंडळाचा विरोध होता म्हणून भाऊसाहेब रंगारी यांचा फोटो लावण्यात आला नाही, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले. कोणत्या मंडळाने विरोध केला याची माहिती त्या देत नाहीत. यातून त्यांची मानसिकता समोर येते आहे. हे पालिकेचे षडयंत्र आहे. यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे 126 वे वर्ष जाहीर करावे, अन्यथा आम्ही 20 तारखेपासून उपोषणाला बसू, असा इशारा मंडळाने दिला.
चूकीचा इतिहास मांडला जातोय
समाजापुढे अत्यंत चूकीच्या पध्दतीने गणेश उत्सवाचा इतिहास मांडला जात आहे. यंदा पुणे महापालिकेच्या वतीने 125 वे वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देखील त्यांच्याशी संवाद साधला. मात्र त्यांनी त्यावर काही भाष्य केले नाही. तसेच या उत्सवापूर्वी महापौरांसमावेत झालेल्या बैठकीत महापौरांनी भाऊ रंगारी यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केल्याची कबुली दिल्याचे सांगितले आहे. मात्र, आता महापौर पुढे येऊन बोलत नाही. यावरून अनेक शंका उपस्थित होतात, असे रंगारी ट्रस्टचे रेणूसे यांनी सांगितले.
चूकीच्या गोष्टींवर बोलणार नाही
चुकीच्या गोष्टीबाबत मी प्रतिक्रिया देणार नाही. गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक आहेत. दुसर्या गोष्टीबाबत मी बोलणार नाही.
-मुक्ता टिळक, महापौर