पुणे । सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली आणि लोकमान्य टिळक यांनी प्रसारक म्हणून काम केले आहे, अशी भूमिका भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सार्वजनिक गणेश उत्सवाचे 125 वे वर्ष नसून 126 वे वर्ष असल्याचे सरकारने जाहीर करावे, या मागणीसाठी भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्रीय उपोषणास रविवारपासून सुरुवात केली आहे. सोमवारीही हे उपोषण सुरूच होते.
या उपोषणाचा सोमवारी दुसरा दिवस होता. यावेळी मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले की, समाजापुढे अत्यंत चुकीच्या पद्धतीने गणेश उत्सवाचा इतिहास मांडला जात आहे. यंदा पुणे महापालिकेच्या वतीने 125 वे वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देखील त्यांच्याशी संवाद साधला. मात्र त्यांनी त्यावर काही भाष्य केले नाही. तसेच या उत्सवापूर्वी महापौरांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी भाऊ रंगारी यांनी सुरुवात केल्याची कबुली दिल्याचे सांगितले. मात्र, त्या आता पुढे येऊन बोलत नाही. यावरून अनेक शंका उपस्थित होत आहे. त्याचबरोबर भाऊ साहेबांचा फोटो महापौरांना देऊन देखील लावला नाही. गणेश उत्सवाला सुरुवात होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे सार्वजनिक गणेश उत्सवाचे 126 वे वर्ष असल्याचे जाहीर करावे अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असे रेणुसे यांनी सांगितले.