पुणे । भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून जाहीर करावे, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांची याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. पुढील 14 दिवसात राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांनी या संदर्भात आपले म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीत यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करून बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरू केल्याचे दाखविण्यात आले असले तरी वास्तविकता मात्र वेगळीच असून गणेशोत्सव टिळकांनी नव्हे तर भाऊ रंगारी यांनी सुरू केल्याचा दावा गणेश मंडळाच्या विश्वस्तांनी केला आहे.
वारंवार सरकारकडे मागणी करून देखील कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी तीन मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली, असे या याचिकेत म्हटले आहे.