भागवतकथा व अखंड हरिनाम सोहळा उत्साहात

0

नवी सांगवी : ह.भ.प. उज्ज्वलानंद महाराज यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद् भागवतकथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सोहळा भजन, कीर्तन, हरिजागर आदी कार्यक्रमांनी नुकताच श्री क्षेत्र रामेश्‍वर (तामिळनाडू) येथे उत्साहात झाला. या सोहळ्याची सांगता ग्रंथ मिरवणूक, दिंडी प्रदक्षिणा व काल्याच्या कीर्तनाने झाली. पहिल्या दिवशी अचलबेट देवस्थानचे ह.भ.प. हरी महाराज लवटे गुरुजी यांनी ’नाम गोड नाम गोड, पुरे कोड सकळही!’, या अभंगावर मार्मिक विवेचन करीत कीर्तनसेवा सादर केली. तर दुसर्‍या दिवशी ह.भ.प. बळीराम महाराज काळे (सुगावकर) यांनी ‘काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती’, या अभंगावर कीर्तन सेवा सादर केली.

ग्रंथ मिरवणूक, दिंडी प्रदक्षिणा
तिसर्‍या दिवशी ह.भ.प नंदु महाराज पांचाळ यांनी ‘धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी’, या अभंगावर कीर्तन सेवा दिली. चौथ्या दिवशी ह.भ.प. बाबा महाराज काटगावकर, लातूर यांनी ‘अर्धक्षण घडता संतांची संगती, ते होई शांती महत पापा’ या अभंगावर कीर्तन सेवा सादर केली. काल्याचे कीर्तन ह.भ.प. महेश महाराज (माकणीकर) यांनी केले. त्यांनी ‘कोणी एक भूलक्या नारी’, या अभंगावर काल्याचे कीर्तन केले. यावेळी कासारवाडी येथील दत्त आश्रमाचे ह.भ.प. शिवानंद महाराज, दत्त आश्रम सांगवीचे ह.भ.प. तुकाराम महाराज, ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प. नाना शितोळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, शिवाजी सुतार, नरेंद्र चौधरी, नाना फुलपगारे, पंडित चव्हाण, बळीराम घोडके, परमार्थ साधक, कमंडानंद मोर्णी बाबा महाराज, विणेकरी ह.भ.प. विश्‍वनाथ मोरे महाराज, बिरादार साहेब, राजेंद्र मोरे यांच्यासह उज्वलानंद महाराज भक्त मंडळ आदी उपस्थित होते.