धुळे । जागेच्या वादातून भाच्याने मुसळीने ठेचून मामाचा खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील नवलाणे गावात घडली. दरम्यान खुनाची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर वारे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता याप्रकरणी चौघा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयितांना अटक करण्यात आली.
मुसळीने ठेचून केला खून
चैत्राम नबा पाटील 70,रा.नवलाणे ता.धुळे हे गावात राहतात. त्यांच गावात त्यांचे भाचे प्रेमदास व येज्ञेश्वर हिंमत मासुळे हेही राहतात. या मामा व भाच्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा वाद सुरु होता. दि 31 रोजी मामा चैत्राम व भाचे प्रेमदास, येज्ञेश्वर यांच्यात जोरदार भांडण झाले. हा वाद टोकाला गेला. संतापात प्रेमदास हिंमत मासुळे, येज्ञेश्वर हिंमत मासुळे व या दोघांच्या बायकांनी चैत्रामाला मुसळीने ठेचून त्याचा खून केला.
सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी नवलाणे गावात धाव घेतली. या प्रकरणी चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच खुन करण्यासाठी वापरलेली मुसळी हस्तगत केली. तर मृत चैत्राम पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.