भोपाळ- भाजपाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत भाजपाने अनेक महत्त्वाची नावे जाहीर केली असून यामध्ये दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भाच्याचे नाव आहे. मोरेनाचे खासदार अनुप मिश्रा यांनाही भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.
ग्वालियर-चंबळ भागातील ब्राम्हण चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप मिश्रा यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून डावललं जात होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भाजपाला निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता असून त्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे.
संसदेत पक्षाला घरचा अहेर देत टीका केल्याने अनुप मिश्रा चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांची योग्य अंमलबजावणी केली जात नसून, संबंधित लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची टीका त्यांनी केली होती. अनुप मिश्रा यांचा नातेवाईक 2010 मध्ये एका हत्या प्रकरणात अडकला होता. यानंतर अनुप मिश्रा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळातून पायउतार झाले होते.