भाजपकडून आमच्या आमदारांना फोन; कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा खळबळजनक दावा

0

मुंबई: भाजपा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ मिळाले नसल्यामुळे आता त्यांच्याकडून घोडेबाजार होत आहे. सत्तेचे समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना फोन येत आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. मात्र भाजपचे हे प्रयत्न फोल ठरणार असून असे कितीही प्रयत्न केले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 15 दिवस झाले तरी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. उद्यापर्यंत सत्तास्थापनेचा घोळ मिटला नाही तर राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचं राजकारणंही सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपकडून फोन केले जात असून त्याचा गौप्यस्फोट खुद्द जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी केला.