मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भाजप सरकारच्या काळातील निर्णयाला स्थगिती देण्याचा सपाटा सुरु केला आहे. आरे कारशेड प्रकल्प, मेट्रो, कोस्टल रोड आदी प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. आरे प्रकल्पाच्या विरोधात आंदोलक केलेल्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहे. यावर भाजपचे मुंबई सरचिटणीस मोहित भारतीय यांनी टीका केली आहे. मात्र, टीका करताना आंदोलनकर्त्यांची तुलना कुख्यात गुंड दाऊदशी केली. ‘सूत्रांनुसार, महाराष्ट्र सरकारकडून लवकरच दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीन चिट देण्याची शक्यता आहे,’ असे ट्विट मोहित भारतीय यांनी केले आहे. यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. मोहित भारतीयांच्या टीकेनंतर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरे कारशेडविरोधी आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी काल सोमवारी संध्याकाळी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आदेश दिले. ठाकरे सरकारच्या या निर्णयांमुळं ‘आरे’ आणि ‘नाणार’ आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी, त्यावर सध्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीका केली आहे.