अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले
पुणे : पुण्यातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार? यावर पडदा पडला असून भाजपकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना कात्रजचा घाट दाखवत उमेदवारीची माळ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या गळयात टाकली आहे. तर बारामती लोकसभा मतदार संघातून रासपचे आमदार राहुल कुल याच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली असुन आता कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार आहेत.
पुणे लोकसभेसाठी बापट यांच्यासह विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे इच्छुक होते. तर काकडेंनी बंडखोरीचा झेंडा हातात घेत काँग्रेस मध्ये जाण्याची घोषणाही केली होती. मात्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काकडे यांची समजूत काढली तर पक्षाने शिरोळे यांचे तिकीट कापल्याने बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री उशीरा भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली असून त्यात ही नावे आहेत.
पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार : शिरोळे
लोकसभेसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना तिकीट दिले नसले तरी, आपण पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत शिरोळे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आजवर जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. त्यांनी वेळोवेळी माझ्यावर टाकलेल्या या जबाबदार्यांसाठी मी त्यांचा ऋणी आहे. या नंतरही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षाचे काम करीत राहील. पुणे शहरात देखील पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असेल, असेही शिरोळे यांनी स्पष्ट केले आहे.