भाजपकडून जुन्या इमारतींच्या पुनर्विकाचे गाजर

0

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींची अवस्था वाईट असून अशा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी भाजपा पुढाकार घेईल, असे आश्वासन मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी दिले. मोडकळीस आलेल्या इमारतीत जीव मुठीत धरून राहणार्‍या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शक्य त्या सर्व स्तरावर आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

दरम्यान मीरा भाईंदर महापालिका निवडणूक 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रमांक एकच पक्ष बनण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केलेल्या भाजपने आतापासून नवनवीन घोषणा करणे सुरू केले आहे. घाटकोपर येथे दोन दिवसांपूर्वी एक इमारत कोसळली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदरमधील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या पुर्नविकासाचा मुद्दा मांडत तसेच आश्वासन दिले.

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या सीआरझेड क्षेत्रातील इमारती तसेच महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्याजुन्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. या शिवाय अनेक खासगी इमारतीही धोकादायक स्थितीत असून मालक आणि भाडेकरूंच्या वादामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. अशा परिस्थितीत या इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे अक्षरश: जीव मुठीत धरून राहत आहेत. ही बाब लक्षात घेत या इमारतीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाच्या जाहिरनाम्यात आम्ही पुनर्विकासाच्या या मुद्द्यांचा विस्तृतपणे ऊहापोह करणार आहोत, असे आमदार मेहता म्हणाले.