भाजपकडे माझी बनावट सेक्स सीडी!

0

अहमदाबाद : मला बदनाम करण्यासाठी भाजपने माझी खोटी सेक्स सीडी बनविली आहे, असा गंभीर आरोप गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. मला बदनाम करण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यासाठी त्यांनी बनावट सेक्स सीडी तयार केली, असा आरोप हार्दिकने केला. निवडणुकीच्या काळात ही सीडी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, आपण भाजपकडून दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो? त्यामुळे केवळ पाहा आणि आनंद घ्या, असे हार्दिक म्हणाला. ही भाजपची जुनी पद्धत असल्याचेही तो म्हणाला. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी हार्दिकच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने या प्रकाराबाबत संशयाचे वातावरण आणखी गडद झाले आहे.

ओबीसी, पाटीदार, काँग्रेसकडून आव्हान
गुजरातमध्ये ओबीसी मतदार 40 टक्के तर पाटीदार समाज 12 टक्के असून या समाजालाही आरक्षण द्यावे या मागणीसाठी हार्दिक पटेलच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने आंदोलन केले होते. अल्पेश ठाकोर यांच्यापाठोपाठ हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसनेही भाजपविरोधी घटकांची मोट बांधण्यात बर्‍यापैकी यश मिळवले आहे. यामुळे भाजप तगडे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही मार्गाने जाण्यास भाजप तयार असल्याचे दिसत आहे.

3550 व्हीव्हीपीएटी यंत्रे नादुरुस्त
गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत घोळ करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी निवडणुकीत नादुरुस्त व्हीव्हीपीएटी यंत्रांचाही वापर केला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीत 3550 यंत्रे नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे, असेही हार्दिक म्हणाला. तसेच भाजपला निवडणुकीत मोठे आव्हान निर्माण केल्याने मला बदनाम करण्यासाठी खोटी सेक्स सीडी भाजपने तयार केली आहे, असा गंभीर आरोपही हार्दिक पटेलने केल्याने गुजरातच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.