नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने काल लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपने संकल्पपत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. ७५ संकल्पांचा यात समावेश आहे. दरम्यान कॉंग्रेसने भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. ‘बंद दाराआड तयार करण्यात आलेल्या भाजपच्या संकल्पपत्रात दूरदृष्टीचा अभाव असून हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेले आहे,’ अशी खोचक टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
भाजपने संकल्पपत्र या नावाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी ट्विटवरून टीका केली आहे. भाजपचा निवडणूक जाहीरनामा बंद दाराआड बनविण्यात आला आहे. एकांगी विचाराने हा जाहीरनामा प्रेरित आहे. त्यात दूरदृष्टीचा अभाव असून अहंकाराने भरलेला हा जाहीरनामा असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा लोकांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे. त्यात सशक्त भारतीयांचा आवाज आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात नेमका त्याचाच अभाव आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरमधील ३७०, ३५अ कलम रद्द करण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापासूनचं आश्वासन दिले आहे.