नवी दिल्ली:सध्या केंद्रात बहुमताने सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आज आपला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपाने जाहीरनाम्याला संकल्पपत्र असे नाव दिले आहे. या संकल्पपत्रात ७५ संकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ पर्यंत हे ७५ संकल्प पूर्ण केले जाईल असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यातून दिले आहे. संकल्पपत्रात राममंदिराचा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. प्रसिद्धीवेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज उपस्थित होते. काँग्रेसच्या ‘न्याय’ला योजनेला टक्कर देण्यासाठी भाजपाने ‘संकल्पपत्र’ केले आहे. शेतकरी, रोजगार, राष्ट्रीय सुरक्षा, महिला सुरक्षा आदी वर्गांना या संकल्पपत्रात स्थान देण्यात आले आहे.
दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’
जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत दहशतवादाप्रती कठोर भूमिका घेतली जाईल त्यासाठी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ राबविली जाईल असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना पेंशन सुरु करणार असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राम मंदिर बांधण्यासाठी कटिबद्ध
राम मंदिराच्या निर्माणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु. लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करु. राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जाहीरनामा प्रकाशनाच्या वेळी म्हणाले.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे
१ देशातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेच लाभ
२ राष्ट्रवादाला प्राधान्य दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’
३ सिटीजनशिप विधेयकाला लागू करणार
४ राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करण्यात येईल
५ २०२२ पर्यंत सर्व रेल्वे लाईनचे विद्युतीकरण केले जाईल
६ व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीची जागा वाढविली जाईल
७ ७५ वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाईल
८ ५ किमी अंतरावर बँकिंग सुविधा निर्माण करण्याचे ध्येय जाईल
९ छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन लागू केली जाईल
१० तिहेरी तलाकविरोधात कठोर कायदा आणला जाईल