भाजपचा ठोकशाहीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेचा प्रयत्न हाणून पाडा-अशोक चव्हाण

0

गडचिरोली – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा आज गडचिरोलीत आहे. यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार लोकशाही संपविण्याची भाषा करत आहे. हे सरकार आल्यापासून अशा घटना समोर येत आहे, यावरून असे दिसते की लोकशाही संपविण्यासाठीच हे सरकार काम करत आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. आम्ही विनम्रपणे लोकांकडे जातो, हे मात्र ‘उखाड देंगे, फेक देंगे’ म्हणत गुंडांची भाषा वापरतात. हे उन्मत्त सरकार आता पत्रकार, साहित्यिकांच्या लिखाणावही बंदी घालत आहे, ही लोकशाही नाही तर ठोकशाही आहे. ठोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काजीब करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडा आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आमचे सरकार आणा, असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

यावेळी मंचावर विधिमंडळ उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव आणि विदर्भ समन्वयक आशिष दुवा, माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आशिष देशमुख, आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आनंदराव गेडाम, अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे, अतुल लोंढे, किशोर गजभिये, रविंद्र दरेकर, जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, अमर वराडे, अनंत गावड यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक सतीश विधाते तर आभार प्रदर्शन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्हाभरातील नागरिक उपस्थित होते.