भाजपचा डाव उधळून लावू : महादेव बाबर

0

हडपसर । रामटेकडी कचरा डेपोविरोधात 1 ऑक्टोबरला निघणार्‍या सर्वपक्षीय मोर्चाबाबत लोकजागृती करन्यासाठी शिवसेना आणि रामटेकडी कचरा डेपो हटाव कृती समितीच्या वतीने रविवारी निषेध रॅली काढण्यात आली. भाजपाने पैसे कमावण्याकरीता रामटेकडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प आणला असून शिवसेना हा डाव उधळून लावील, असा इशारा सेनेचे माजी आमदार, शहर सहसंपर्कप्रमुख महादेव बाबर यांनी दिला. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे, अमोल हरपळे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट, संगीता ठोसर, माजी नगरसेवक भरत चौधरी, विजय देशमुख, विक्रम लोणकर, प्रसाद बाबर, संजय शिंदे, मकरंद केदारी, जान मोहंमद, शिवा शेवाळे, सतीश जगताप, सुरज मोराळे, संजय सपकाळ, विकास भुजबळ आदी उपस्थित होते.

स्वतःच्या स्वार्थाकरीता भाजप हडपसरवासीयांच्या माथी हे हानिकारक प्रकल्प मारीत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया या रोगांच्या साथी पसरून जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. पण भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व जनतेने 1 ऑक्टोबर रोजी निघणार्‍या सर्व पक्षीय मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन बाबर यांनी केले. जितू कदम, वीरभद्र गाभने, अजय सकपाळ, बाबू काळे, सरडे महाराज, अनिल जगदाळे, अभिमन्यू भानगिरे, नंदू फुलारे आदींसह शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

पैसे कमविण्याचा डाव
पुणेकरांचा कचरा टाकण्यासाठी भाजपच्या सत्ताधार्‍यांना शहराच्या चारही बाजुंना उपलब्ध असलेल्या जागा दिसल्या नाहीत. आधीच या भागात उरुळी देवाची आणि रामटेकडी या ठिकाणी असलेल्या कचरा डेपोंनी लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असताना भाजप केवळ पैसे कमवण्यासाठी नव्याने 2 हजार टन कचरा या ठिकाणी आणण्याकरीता दडपशाहीचा अवलंब करीत आहे, असे बाबर यांनी सांगितले.

पोतराजांनी लक्ष वेधले
ससाणेनगर येथून निघालेल्या या जागर मोर्चाने हडपसरकरांचे लक्ष वेधले. अनोखी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधणार्‍या माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनास नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. रॅलीतील आसूडधारी पोतराज युवकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गांधी चौकात कचरा टाकून भाजपचा निषेध करण्यात आला.

कचरा प्रकल्पाविरोधात जनजागृती रॅली
रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत चालला आहे. येथील नागरिकांनी एकत्र येऊन हडपसर रामटेकडी कचरा हटाव कृती समिती स्थापन केली असून याअंतर्गत जनजागृती रॅली काढली होती. हेमलता ढमढेरे, हर्षा ढमढेरे, वंदना कराळे, प्रशांत यवतकर, राजेंद्र बोंडगे, दिनेश पडवळ, तेजस यादव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

भाजपचा घाणेरडा मनसुबा
पुणे महानगरपालिकेने आमच्या रामटेकडी भागात कचरा प्रकल्प राबवण्यासाठी 23 एकर जागा घेतली. येथे पुण्याचा कचरा आणून टाकण्याचा घाणेरडा मनसुबा आखला आहे. भाजप स्वच्छ भारत अभियान राबवितात आणि शहराचा कचरा रामटेकडीत आणून टाकतात. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा प्रकल्प राबविणार्‍या भाजपा व पुणे महानगरपालीका प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो.
– रामभाऊ कसबे,
रामटेकडी कृती समिती

कचरा निमुर्लनासाठी तंत्रज्ञान
गेल्या 8 वर्षापासून आम्ही कचरा या विषयावर काम करत आहोत. दोन वर्षापासून भुमी ग्रीन या कंपनीमार्फत कचरा प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. शहरातील कचरा निर्मुलनासाठी कचरा प्रक्रिया या विषयीचे तंत्रज्ञान विकसित केले. 200 टन क्षमतेचा हा प्रकल्प आम्ही आजतगायत पुर्ण क्षमतेने चालवत आहोत. यातून खत निर्मिती केली जाते. सोशल मिडीयावरुन माझ्याबद्दल आमदारांचा भाऊ असे गैरसमज पसरविले जात आहेत. रोकेम, नोबेल तसेच नवीन ओ.आर.एस कंपनीशी संबंध नाही.
– विजय टिळेकर, भूमी ग्रीन, शेवाळेवाडी