नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राईकला प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात याच मुद्यांना हात घातला. नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधक टीका करत असले, तरी सर्वसामान्य नागरिकांनी हा मोटा बदल स्वीकारला आहे. त्यामुळे पक्षाने सर्व राज्यांत सक्षमतेने सरकारची धोरणे पोचवण्यासाठी पुढे गेले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. त्यावरून आगामी निवडणुकीत भाजप नोटाबंदीचा मुद्दा पुढे करण्याची शक्यता आहेे. तर दुसरीकडे पंतप्रधानांनी स्वकीयांना कानपिचक्या देत लायकीनुसाराच तिकिटे देण्यात येतील असे बजावले आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही याच दोन मुद्यांवर आधारित भाषण केले हे विशेष. मोदींच्या भाषणाने या बैठकीची सांगता झाली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी तयार व्हावे, या निवडणुकांत आपण नक्कीच विजयी होऊ, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची सर्वोत्तम सेवा आहे, हे मी जाणून आहे. मी गरिबीत जन्मलो, गरिबीतच वाढलो त्यामुळे मला गरिबांचे दुःख माहीत आहे, ते मला इतरांनी सांगण्याची गरज नाही. आम्ही राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगून त्यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदीसारखा निर्णय फक्त आपलेच सरकार घेऊ शकले असे आत्मविश्वासाने सांगतात, सर्व सभासदांनी उभे राहून मोदींना अभिवादन केले.
आतुर असणार्यांना इशारा
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेत्यांना इशारा दिला. ’ज्याची लायकी असेल त्याला (निवडणुकीसाठी) तिकीट मिळेल, त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकू नये’ असा स्पष्ट इशारा मोदींनी दिला. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ’ गरीब आणि गरीबी म्हणजे आमच्यासाठी मतपेट्या नसून गरीबांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा मानतो. आमच्या सरकारचा हाच संकल्प आहे’ असे मोदींनी नमूद केले. तसेच ’ काही जणांना त्यांच्या लाईफ स्टाईलची चिंता असते पण गरीबांना चांगले, दर्जेदार आयुष्य द्यायचे आहे’ असेही मोदींनी सांगितल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.
काँग्रेसचा हल्लाबोल
भाजपाचे नेते आणि बँकांचे मोठे अधिकारी यांनी मिळून काळापैसा पांढरा करण्याचे फार मोठे षडयंत्र रचले आणि त्यासाठीच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी केला. या षडयंत्राची माहिती कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही असू शकते मात्र ते याबाबत मौन बाळगून आहेत, असे ते म्हणाले. मुंबई येथे गांधीभवन या काँग्रेसच्या प्रदेश संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत कपिल सिब्बल बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण,विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस याबाबत त्यांना याबाबत आपण प्रश्न विचारू, असे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
कमिशनद्वारे काळा पैसा पांढरा केला
कपिल सिब्बल म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयानंतर 15.15 लाख कोटी रूपयांपैकी 14.97 लाख कोटी रूपये आजघडीला बँकांमध्ये जमा झाले आहेत.पंतप्रधान मोदी म्हणत होते की फार मोठया प्रमाणात काळा पैसा नष्ट होणार आहे. पण जवळपास सर्वच पैसा तर खात्यांमध्ये आला. या माध्यमातून कमिशन देउन अनेक जणांनी आपला काळा पैसा पांढरा करून घेतला आहे.हे सर्व षडयंत्र भाजपाने रचल्याचा आमचा आरोप आहे.यात बँकांचे मोठे अधिकारी देखील सहभागी आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली पाहिजे.काँग्रेसने 60 वर्षांचा हिशेब दयावा अशी मागणी मोदी करायचे.मात्र ते स्वतः गेल्या 50 दिवसांचा हिशेब देऊ शकत नाहीत असेही सिब्बल म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने 8 नोव्हेंबर रोजी घेतला.तेव्हा त्यांच्या 21 सदस्यीय संचालक मंडळापैकी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यासोबत केवळ 8 संचालकच उपस्थित होते.ते सर्व सरकार नियुक्त संचालक होते.एकही स्वतंत्र संचालक या बैठकीस उपस्थित नव्हता.म्हणजे एकप्रकारे सरकारनेच हा निर्णय घेतला असल्याचेही कपिल सिब्बल म्हणाले.केंद्रिय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडण्यामागे भाजपाची चाल आहे.
नोटाबंदीला देशाने स्वीकारले
मोदींनी केलेल्या भाषणाची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांना दिली. चलनाची अनियंत्रित निर्मिती हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे कारण आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या मुळाशीही रोकड रक्कम आहे. नोटबंदीच्या बाजूने संपूर्ण देश उभा राहिला. देशाच्या गरीबांनी नोटबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय स्वीकारला, असे मोदी म्हणाले. काही दिवसांसाठी त्रास झाला. पण जनतेने सहन करत मोठा बदल स्वीकारला. या कालावधीत समाजाच्या शक्तीचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.