पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षातील सरकारचे अपयश झाकण्यासाठी गांधी आणि पवार कुटुंबीयांवर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या टीकेमूळे आमच्या अंगाला भोके पडत नाहीत, अशा शब्दांत मोदींना प्रत्युत्तर देत भाजपचा पराभव करणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात केले. पुण्यात आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे पवार घराण्यात गृहकलह असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले, आतापर्यंत पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावर टीका केली जात होती, आता माझेही नाव घेतले जात आहे. पण मोदी साहेब आम्ही घराच्या संस्कारात वाढलेलो आहोत. मोदींना घराचा अनुभवच नाही. घरातले कुठे आहेत, त्याचा पत्ता लागत नाही. कधीतरी त्यांचे फोटो पहायला मिळतात, आणि हे दुसर्याच्या घराची चौकशी करतात, असा टोलाही पवार यांनी लगावला.