पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ काही तासांवर येऊन ठेपली असली तरी, अद्यापही सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याने त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र चुरस असल्याने उमेदवाराचे नाव ऐनवेळी म्हणजे गुरुवारी दुपारी एकनंतरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर निवडीसाठी 14 मार्चला नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा होणार आहे. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज 9 मार्चला दुपारी तीन ते पाच या वेळेत नगरसचिवांकडे दाखल करायचे आहेत. महापालिका निवडणुकीत 128 पैकी 77 जागा जिंकून भाजपने प्रथमच सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे भाजपचा पहिला महापौर कोण असणार, याबाबत राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे.
महापौर निवडीचे अधिकार मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना!
पिंपरी-चिंचवडचे महापौरपद यावेळी नागरिकांच्या मागासवर्गासाठी म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या स्थानिक निवड समितीने महापौरपदासाठी पाच नावांची शिफारस केली असून, उमेदवार निवडीचे अंतिम अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना दिले आहेत. महापौरपदाच्या शर्यतीत अंतिम फेरीत नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, नितीन काळजे, संतोष लोंढे, राहुल जाधव व केशव घोळवे यांची नावे असून, त्यापैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाच्या उमेदवारीची माळ मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. सभागृहातील संख्याबळ लक्षात घेता महापौर निवडणूक न लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता फक्त शिल्लक राहणार आहे. त्यामुळे या पदाचा मान कोणाला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर निवडणूक बिनविरोध होणार!
महापालिका निवडणुकीत तब्बल 77 जागा भाजपने पटकाविल्या, तर राष्ट्रवादी काँगे्रसला 36 जागांपर्यंत मजल मारता आली. दुसर्या क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे संकेत पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील नगरसेवकांच्या बैठकीत दिले आहेत. त्यास या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांनीदेखील दुजोरा दिला आहे. या दोन्ही पदांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी न उतरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. मंगळवारी महापौरपदासाठी नगरसचिव कार्यालयातून चार अर्ज नेण्यात आले, तर उपमहापौरपदासाठी एकूण सहा अर्ज नेले. भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्याने महापौर, उपमहापौर यांच्या निवडी बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात असले, तरी इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच या पदांवर आपल्या समर्थकालाच संधी मिळावी यासाठी पदाधिकार्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. बुधवारी अनेकांनी मुंबईत जाऊन प्रदेश पदाधिकार्यांच्या भेटीगाठी घेतल्या.