पोलिसांशी झाली चांगलीच बाचाबाची
पिंपरी-चिंचवड –आकुर्डीतील मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शनिवारी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. हा पालखी सोहळा दापोडीतून दरमजल करीत मार्गस्त होत असताना महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाजपचा एक पिस्तुलधारी नगरसेवक चक्क वारीत घुसला. मात्र, याची चाहूल लागताच पोलिसांनी त्याला तातडीने बाजुला सारले. यानंतर पोलीसांची त्याच्याशी चांगलीच बाचाबाची झाली.
पिस्तुल दिले सहकार्याकडे
पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात दोन दिवसांसाठी आल्याने सर्वत्र उत्साही वातावरण होते. हा सोहळा शनिवारी दुपारी राजेशाही थाटात मार्गस्थ होत असताना पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वारकर्यांच्या सुरक्षितेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्याचवेळी नियम धाब्यावर बसवून शहरातील भाजपचा उच्चशिक्षीत पिस्तुलधारी नगरसेवक दापोडी येथे वारीत घुसला. पादुकांचे दर्शन घेत असताना नगरसेवकाने आपल्या जवळील पिस्तुल सहकार्याच्या स्वाधीन केले होते. मात्र, नगरसेवकाचा सहकारी हातात पिस्तुल घेऊन खुलेआम रथाभोवती फिरत होता. त्याच्या हातातील पिस्तुल पाहताच वारकरी देखील भयभीत झाले.
पोलिसांनी केले जप्त कारवाई
याची माहिती मिळताच पोलिसांनी या साथीदाराला ताब्यात पिस्तुल जप्त केले. हे कळताच नगरसेवक सरसावला. यानंतर पोलीसांशी वाद घातला. वातावरण चांगलेच चिघळण्याच्या मार्गावर होते. तेवढ्यात पिस्तुल बाळगण्याचा परवाना दाखविल्यानंतर वाद शमला. मग जप्त पिस्तुल वरीष्टांकडून घेऊन जाण्याची सूचना पोलिसांनी नगरसेवकाला केली होती. शेवटी वरीष्ठ स्तरावरून सुत्रे हलल्याने कनिष्ठ पोलिसांना हे पिस्तुल परत करणे भाग पडले.
पिस्तुल बाळगण्याचे फॅड
पिस्तुल बाळगण्याचा परवाना असला तरी संबंधित नगरसेवक अथवा राजकीय पुढारी आपल्याजवळील पिस्तुल काही कारणास्तव सहकार्याच्या स्वाधीन करतात. परंतु, या सहकार्यानेच जर हे पिस्तुल कोणावर रोखल्यास सुरक्षेची हमी कोण देणार?, सध्या खासदार, आमदारांसह नगरसेवकांमध्ये स्वतःच्या सुरक्षेपोटी पिस्तुल बाळगण्याचे फॅड पिंपरी-चिंचवडमध्ये चांगलेच गाजत आहे. संबंधित नगरसेवकाने हे शस्त्र तात्पुरत्या वेळेसाठी रितसर पोलिसांच्या स्वाधीन केले असते, तरी ते कायद्याचा सन्मान करणारे ठरले असते. मात्र, या उच्चशिक्षीत नगरसेवकाला तसे करावे, असे जरा सुध्दा वाटले नाही. हा नगरसेवक जुनी सांगवी येथील असल्याचे बोलले जात आहे.