भाजपचा विजय मनीपॉवरमुळेच

0

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला. या निवडणूकीत पंजाब वगळता सपाटून पराभव झालेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अजूनपर्यंत मौन बाळगले होते. मात्र, मंगळवारी त्यांनी हे मौन सोडत एकीकडे पराभव मान्य केला तर दुसरीकडे भाजपवर आरोप केले. राहुल यांनी भाजपचा विजय केवळ मनीपॉवरमुळेच झाल्याचे सांगितले. येथून पुढेही आमचा भाजपच्या विचारधारेविरोधातील लढा सुरुच राहील, असे त्यांनी म्हटले.

काँग्रेसमध्ये बदल करण्याची गरज
राहुल गांधी म्हणाले, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील पराभव आम्ही स्वीकारतो. काँग्रेस पक्षात बदल करण्याची गरज आहे. मणिपूर आणि गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने पैशाचा गैरवापर केल्यामुळेच त्यांना सत्ता मिळत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आमची कामगिरी वाईट झाली. आम्ही तिथे विरोधक आहोत. पश्चिम यूपीमध्ये भाजपने मतदारांचे ध्रुवीकरण केले. राजकारणात चढ-उतार येतच असतात. पण भाजपच्या विचारधारेविरोधात आमची लढाई सुरूच राहील.

तीन राज्यात आमचा क्रमांक पहिला
गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसपेक्षा कमी जागा असतानाही, सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने पैशाचा वापर केला आहे. आम्ही पाच राज्यांमध्ये निवडणूक लढलो. त्यापैकी तीन राज्यांत आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. पंजाबमध्ये आम्ही सरकारही स्थापन केले. पण, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने सत्ता चोरण्यासाठी पैशांचा वापर केला. त्यांची हीच विचारधारा आम्हाला मान्य नाही.

राहुल गांधींनी पुरवे द्यावेत
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मनीपॉवरमुळेच भाजपचा विजय झाल्याचे वक्तव्य केल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद रंगू लागला आहे. राहुल गांधींनी भाजपवर आरोप करताना पुरावे द्यावेत, अन्य पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिल्याने आम्ही सरकार बनवतोय, कुठलाही घोडेबाजार केलेला नाही, असं उत्तर भाजप नेते सिद्धार्थ नाथ सिंह यांनी दिले आहे.