भाजपची काँग्रेसकडेच उमेदवाराची विचारणा

0

नवी दिल्ली । पुढच्या महिन्यात होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून गठित करण्यात आलेल्या समितीमधील सदस्य वेंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. केंद्र सरकारची इच्छा आहे की, राष्ट्रपती निवडणूक सर्वसंमतीने व्हावी. त्यासाठीच भाजपकडून काँग्रेस अध्यक्षा सोनियांची भेट घेतली. दरम्यान या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी सांगितल ते आमच्याकडे सहकार्याच्या अपेक्षेने आले होते. परंतु प्रश्न असा आहे की, जर तुम्हाला राष्ट्रपती उमेदवाराचे नावच माहीत नसेल तर सहमती कोणत्या गोष्टींवर होऊ शकते आम्ही कोणत्या गोष्टीसाठी समर्थन द्यायचे.

तर चहावाला राष्ट्रपती का नाही?
एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो तर एक चहावाला देशाचा राष्ट्रपती बनण्याचे स्वप्न पाहू शकत नाही का? मध्य प्रदेशमधील आनंदसिंग कुशवाह चहाचे दुकान चालवतात आणि देशाचे राष्ट्रपती बनण्याची त्यांची इच्छा आहे. आपल्या या इच्छापूर्तीसाठी आनंद यांनी चौथ्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आनंद हे वेगवेगळ्या 20 निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत. एकीकडे भाजप आणि काँग्रेससारखी राष्ट्रीयस्तरावरील राजकिय पार्टी उमेदवाराच्या बाबतीत आपला पत्ता उघड करत नाही त्याचवेळी आनंद यांनी चौथ्यांदा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर आपली दावेदारी सांगितली आहे. आनंद हे ग्वाल्हेरचे रहिवासी असून 1994 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून ते आपले नशीब अजामवत आहेत. राष्ट्रपती पदाप्रमाणे आनंद यांनी उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणुक लढली आहे. 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्यावेळीस आनंद यांनी पाच हजार रुपये रोख आणि 10 हजार रुपामची अचल संपत्ती असल्याचे जाहिर केले होते. 2013 मध्ये मध्य प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत आनंद यांना 376 मते मिळाली होती.

राष्ट्रपती पदासाठी या नावांवर चर्चा
काँग्रेसने विरोधकांची मोट बांधण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू ठेवला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांच्या संमतीच्या उमेदवारांपैकी अनेक नावांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी, जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव, लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार आणि एनसीपी प्रमुख शरद पवार आदींची नावे आघाडीवर आहेत. परंतु पवार यांनी आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ई. श्रीधरन यांचाही नकार,सुमीत्रा महाजन चर्चेत
एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण आडवाणींना उमेदवारी मिळू शकते, असा कयास होता. पण बाबरी मशिद खटल्याप्रकरणी आडवाणींवर कट रचल्याचा खटला चालणार आहे. त्यामुळे त्यांचे नाव या स्पर्धेत मागे पडले, असे चर्चिले जात आहे. आता राष्ट्रपतीपदासाठी श्रीधरन यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. कोचीतील मेट्रोचे शनिवारी उद्घाटन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीधरन एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी अटकळ होती. मात्र स्वत: श्रीधरन यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहिर केले. सर्वात अनुभवी खासदार व लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचेही नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आले आहे. महाजन यांच्या रुपात प्रतिभा पाटील यांच्यानंतर देशाला दुसर्‍यांदा महिला राष्ट्रपती मिळू शकण्याची चर्चा आहे. महाजन यांना महाराष्ट्रातून शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे.