भाजपची दिल्लीतील महापालिकांमध्ये हॅट्ट्रीक

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे संपूर्ण देशात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर पहिल्याप्रथम दिल्ली विधानसभेत भाजपला ज्या ‘आप’ने पराभवाची धूळ चारली, त्याच ‘आप’चा भाजपने दारुण पराभव करत या सर्व महापालिकांवर सलग तिसर्‍यांना विजय मिळवून हॅट्ट्रीक साधली आहे. तर काँग्रेसचाही धुव्वा उडवत तीनही महापालिकांतील एकूण 270 जागांपैकी 179 जागांवर विजय मिळवला आहे.

पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिल्ली या तीन महापालिकांच्या निवडणुकांवर आज निकाल जाहीर झाले, त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ दुसर्‍या आणि काँग्रेस तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ‘आप’ने तीन महापालिकांमध्ये मिळून 50 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ 29 जागांवर समाधान मानावे लागले. सत्ताधारी ‘आप’साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नाटकी राजकारण नाकारले
दिल्लीत भाजपला मिळालेला विजय म्हणजे जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या तीन वर्षांतील कारभाराला दिलेली पसंतीची पोचपावती आहे. यानिमित्ताने दिल्लीच्या जनतेने यापुढे नकारात्मक आणि नाटकी राजकारण खपवून घेतले जाणार नाही, हा संदेश दिला आहे. दिल्लीकरांनी भाजपच्या सकारात्मक, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या आणि विकासाच्या राजकारणाला कौल दिला.
अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप.

ईव्हीएम लाटेमुळे विजय
भाजपला मोदी लाटेमुळे नव्हे, तर ईव्हीएम लाटेमुळे विजय मिळाला, असा आरोप त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांपासून या पालिकांमध्ये भाजप सत्तेत आहे. याठिकाणी जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. मात्र, तरीदेखील जनता भाजपलाच निवडून देत आहे, ही गोष्ट न पटण्यासारखी आहे, देशात लोकशाहीच्या मार्गाने नव्हे, तर ईव्हीएम मशीन्सद्वारे भवितव्य ठरवले जात आहे.
गोपाळ राय, आम आदमी पक्षाचे (आप) मंत्री

पक्षात आक्रमकपणाचा अभाव
काँग्रेसचा दिल्लीतील पराभव हा आक्रमकपणाच्या अभावामुळे झाला. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्यामध्ये काँग्रेस कमी पडली. दिल्लीत पराभव झाला असला, तरी पक्ष पुन्हा खंबीरपणे उभा राहील. काँग्रेस देशाचे मूळ आहे. त्यामुळे एका पराभवाने अस्तित्त्व संपणार नाही. महापालिका निवडणुकीसाठी ज्याप्रमाणे प्रचार व्हायला हवा होता, त्याप्रमाणे प्रचार केला गेला नाही.
शीला दीक्षित, माजी मुख्यमंत्री, नवी दिल्ली.

अजय माकन यांचा राजीनामा
दिल्ली महापालिकेतील निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अजय माकन यांनी निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आम्ही थोड्या प्रमाणात का होईना पुनरागमन केले आहे. मात्र, अपेक्षा होती तेवढे यश मिळू शकले नाही, अशी कबुली अजय माकन यांनी दिली. पुढील एक वर्ष मी कोणतेही पद घेणार नाही, सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन, असेही ते म्हणाले.