भाजपची पहिली यादी जाहीर

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लढणार; अडवाणींचा पत्ता कट

महाराष्ट्रातील 16 पैकी 14 विद्यमान खासदारांना उमेदवारी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली. यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगर येथून उमेदवारी देताना लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कापण्यात आला आहे. तर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. भाजपने आपल्या पहिल्या यादीत 182 उमेदवारांची नावे जाहीर केली. महाराष्ट्रातून 16 पैकी 14 विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे.

बड्या नेत्यांच्या नावाची घोषणा…
नागपूरमधून अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले अशी लढत होणार आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले अहमदनगरचे सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीमधून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मंत्री हंसराज अहीर, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पूनम महाजन, प्रीतम मुंडे यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. लातूरमधून सुधाकरराव श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोळा पैकी चौदा विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. नगर आणि लातूरमधून दोन नवे उमेदवार देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील उमेदवार…

नंदूरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव श्रृंगारे
सांगली – संजयकाका पाटील

सतराव्या लोकसभेसाठी विखेंना संधी…
यादीत दोन खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्या दोन जागेवर नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. त्यापैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील असणार आहेत. तर, लातूर मतदारसंघातून सुधाकरराव शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमधून खासदार दिलीप गांधी आणि लातूरमधून खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.

दिलीप गांधींना नाकारले…
विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता करण्यात आला आहे. गांधी यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे भाजपने सुजय यांच्या रुपाने नवा चेहरा अहमदनगरला दिला आहे. दिलीप गांधी यांनी पहिल्यांदा 1999 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटीवर लढणारे माजी खासदार दादापाटील शेळके यांना 2 लाख 50 हजार 51 एवढी मते मिळाली. तर यावेळी खासदार दिलीप गांधी यांना 2 लाख 78 हजार मते मिळाली होती.